मानवी शरीराचे तीन प्रमुख उपस्तंभ
मानवी शरीर हे आहार, निद्रा व ब्रह्मचर्य या तीन प्रमुख उपस्तंभावर (main pillars of life) आधारित आहे. या तीन उपस्तंभांना युक्ती पूर्वक जपले तर आयुष्य असेपर्यंत आपले शरीर यांच्या बळावर शक्ती युक्त, कांती - वर्ण युक्त व पुष्टीयुक्त निरोगी असे राहते. त्यातील पहिला उपस्तंभ म्हणजे निद्रा या विषयावर आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
निद्रा
सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासूनच निद्रेची देखील उत्पत्ती झालेली आहे. निद्रा येण्यासाठी तम हा गुण कारणीभूत असल्याने तिला तमोमुला असे देखील संबोधले जाते. तमोगुणाचे अधिक्य निसर्गतः रात्रीच्या काळी असल्याने ती बहुधा रात्रीच येते. बहुधा म्हणण्याचे कारण हेच की निद्रा दिवसादेखील येऊ शकते परंतु ज्याद्वारे शरीराचे संतुलन टिकविल्या जाते ती निद्रा सर्व प्राणिमात्रांना रात्रीच येते.
आयुर्वेदामध्ये निद्रा येण्याचे कारण व निद्रेची प्रक्रिया अतिशय उत्तम वर्णन केली आहे. आपण दररोज जो आहार घेतो त्यापासून शरीरात कफ निर्माण होतो याच कफामुळे शरीरातील विभिन्न स्त्रोतस असे अवरुद्ध होतात. त्यामुळे दिवसभर विविध कर्म करून थकलेली ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिये आणि मन आपापली कार्य व्यवस्थित करू शकत नाही म्हणूनच निद्रा येते.
दिवसभर विविध कर्मांमध्ये असणाऱ्या ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व मन यांना आलेला थकवा, निसर्गतः रात्री वाढणारा तमोगुण व शरीरातील कफ या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे निद्रा होय. होणाऱ्या
सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊन मुळे सर्वांचेच निद्राचक्र बिघडले आहे. परंतु यामुळे आपल्या शरीराच्या होणाऱ्या हानीचा विचार गांभीर्याने करायला हवा.
त्याद्वारे होणाऱ्या हानीचा विचार करण्यापूर्वी आपण प्राकृतिक निद्रेद्वारे प्राप्त होणारे गुण आपण जाणून घेऊया.
निद्रेचे गुण
निद्रा योग्य मात्रेत घेतल्यास सुख, पुष्टी, बल, वृषता (मैथुन शक्ती), ज्ञान व दीर्घ जीवन यांची प्राप्ती होते. निद्रा हा विषय वाटतो तितका सोपा नसून निद्रा योग्य मात्रेत न घेतल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम बरेच गंभीर व दीर्घकाळ टिकून राहणारे असू शकतात. आयुर्वेदामध्ये योग्यप्रकारे किंवा निद्रा न घेतल्याने होणारे दुष्परिणाम देखील अत्यंत विस्ताराने वर्णन केले आहे.
अकाली निद्रेमुळे होणारे परिणाम
अकाली झोपल्यामुळे डोके जड होणे, शरीरात शीतलहर येणे, सर्व शरीराचे अंगावयव जड होणे, क्वचित ज्वर येणे, चक्कर येणे, स्मृतीभ्रंश होणे, शरीरातील स्त्रोतसांचा अवरोध होणे, अग्निमांद्य म्हणजे भूक व्यवस्थित न लागणे, क्वचित शरीरावर सूज येणे, अरुची म्हणजे जेवणाची इच्छा न होणे, मळमळ होणे, नाक वाहणे, अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे, क्वचित शरीरावर खाज येणे, पीडा होणे, अंगावर चट्टे उठणे, अतिशय वात वाढल्यास खोकला येणे, सुस्ती येणे, गळ्याचे व्याधी होणे, तसेच विषाचा रुग्ण असल्यास विष वेग वाढणे, इत्यादी विकार होतात.
निद्रा विषयक निषेध
रात्री जागरण करण्याने शरीरात रुक्षता वाढते व वाताचा प्रकोप होतो तसेच दिवसा झोप घेण्याने शरीरातील स्निग्धता व कफाचा प्रकोप होतो. म्हणून रात्री झोप न घेता जागरण करून दिवसा झोप घेण्याची स्थिती उद्भवल्यास आयुर्वेदामध्ये अतिशय सोपा असा मार्ग वर्णिला आहे. रात्री जागरण झालेच तर त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून जितका वेळ जागरण झाले असेल त्याच्या अर्धा वेळ सकाळी भोजन करण्यापूर्वी झोप घ्यावी.
दुपारी निद्रेचा निषेध
ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा सोडून अन्य ऋतूंमध्ये दिवसा झोपल्याने कफ व पित्त या दोषांचा प्रकोप होऊन विविध आजारास निमंत्रण दिले जाते. त्यामुळे दुपारी भोजनोत्तर कधीही झोपू नये. जेवणानंतर येणारी तंद्रा घालविण्यासाठी आरामदायक आसनावर बसून किंवा आरामखुर्ची असल्यास त्यामध्ये थोडा विश्राम करावा.
ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये निसर्ग: रुक्षता व उष्णता वाढल्यामुळे तसेच दिवसापेक्षा रात्र छोटी असल्यामुळे दिवसा झोपणे हितकर ठरते.
निद्रानाशाचे उपाय
म्हशीचे दूध, उसाचा रस, मासे, गुळ, पिष्टमय पदार्थ, भात, दूध फाडून तयार केलेला छेना, दही इत्यादींचे सेवन करावे. तसेच उटणे लावणे, स्नान करणे, अभ्यंग करणे, डोक्याला तेल लावणे, कानात तेल सोडणे, डोळ्यांचे तर्पण करणे, चांगला वारा येत असलेल्या ठिकाणी सुगंधित व योग्य स्थान पाहून शय्येवर झोपणे, अंग चेपून घेणे, इत्यादींचा अवलंब करावा तसेच सर्व चिंता मनातून काढून टाकून सदा सुखी आनंदी संतोष करणे आपल्या आवडत्या गोष्टीत रममाण होणे हे सर्व उपाय करावे.
जो नेहमी ब्रह्मचर्याचे पालन करतो, मैथुन सुखाची आसक्ती, इच्छा धरीत नाही तो नेहमी संतुष्ट व तृप्त असतो व त्याला योग्य वेळेला झोप येतेच.